महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगत असलेल्या औराद शहाजानी येथील तेरणा नदीच्या काठावर निसर्गरम्य परिसरात वसलेले आमचे ग्रामीण महाविद्यालय, नॅक, बेंगलोर यांच्याकडून दोन वेळेस पुनर्मूल्यांकन झालेले आणि स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड यांच्याकडून ‘उत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय’ पुरस्कार प्राप्त आमच्या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून महाविद्यालय विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देते. यामध्ये प्रामुख्याने सवलतीत झेरॉक्सची सुविधा, मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन तसेच खेळाडू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कामध्ये सवलत इत्यादीचा समावेश आहे.
औराद शहाजानी व परिसरातील विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर शिक्षणाची सोय व्हावी म्हणून या शैक्षणिक वर्षापासून आम्ही स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड यांचे बहिस्थ पदव्युत्तर अभ्यासक्रम M.A. व M.Com. सुरू करत आहोत. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने शैक्षणिक अभ्यास सहलीच्या माध्यमातून अटारी-वाघा सीमेस भेट, खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत 55 किलो वजन गटातील ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेत ज्ञानेश्वर पाटील यांस कांस्यपदक ही बाब महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवणारी आहे.
आमच्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी हा केवळ पदवी संपादन केलेला न राहता तो परिपूर्ण माणूस होऊन समाजाच्या उत्थानासाठी सदैव तयार असावा, यासाठी मी व माझे सहकारी सातत्याने प्रयत्नशील आहोत. केवळ पदवी प्रमाणपत्रे घेऊन आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचे काही साधणार नाही. यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये विविध कौशल्यांचा अंतर्भाव असणे आवश्यक आहे. म्हणून आमच्या महाविद्यालयात अभ्यासपूरक व अभ्यासक्रमोत्तर विविध उपक्रम राबविले जातात. तसेच विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी महाविद्यालयात विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते.
सीमावर्ती भागात आमचे महाविद्यालय असल्याने कर्नाटकातील मराठी भाषिक विद्यार्थी प्रवेश घेतात. मुलांसोबतच मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी महाविद्यालयाने जोपासली आहे. याप्रसंगी आपणास सांगू इच्छितो की, महाविद्यालयात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अधिक आहे. महिला सबलीकरण व महिला साक्षरता है त्याचे द्योतक आहे. महाविद्यालयाकडून सातत्याने शिस्त व गुणवत्ता यांचे पालन होत आहे. परिसरातील विद्यार्थ्यांनी अकरावी (कला व वाणिज्य) ते बी.ए./बी.कॉम./बी.सी.ए./एम.एस्सी.एस.ई./एम.ए./एम.कॉम. विद्याशाखांमध्ये अगत्याने प्रवेश घ्यावा, असे महाविद्यालय आवाहन करीत आहे.